Skip to main content

३.मराठे सरदार-भोसल्यांचे कर्तबगार घराणे

धामधुमीचा काळ : संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला. तर शूर मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली.

तो काळच मोठा धामधुमीचा होता. महाराष्ट्रात आदिलशहा आणि निजामशहा यांच्यात नेहमी लढाया होत. लढाईसाठी त्यांना फौज लागे. या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत.

शूर मराठे सरदार : मराठे काटक व शूर होते. तसेच ते धाडसी होते, स्वामीनिष्ठ होते. लढाईवर मोठ मोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे. हातात भाला, कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत. मराठे सरदार फौजबंद असत. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला, की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी. त्याला सरदारकी देई कधीकधी जहागिरीही देई. जहागिरी मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत.

विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठे मोठे मराठे सरदार होते. त्यात सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरुळचे भोसले हे प्रमुख होते. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज. जिजाई सिंदखेडच्या लखुजी जाधवांची मुलगी होती.
                             सिंदखेडचे जाधव

शौर्याची परंपरा : हे सारे सरदार शूर वीर होते. पण आपापसात त्यांचे हाडवैर असे. स्वकियांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती. त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे. पण असे असले तरी,महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली. त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले. महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरुळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले.

घृष्णेश्वराचे मंदिर : सुमारे चारशे वर्षांपूर्वीची गोष्ट. वेरूळच्या लेण्यां जवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते. त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता. एवढे महान दैवत ! पण कोण अवकळा आली होती त्या मंदिरावर. त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे.येणारे-जाणारे ही हळहळत,उसासे सोडत, पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो? त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्यनियमाने येत असे. शिवाच्या पिंडीवर बेल फुल वाहत असे. हात जोडून आपल्या मनातले श्रीशिवाला सांगत असे. एक दिवस त्याने गडीमाणसे आणली. मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या. मंदिराची सारी व्यवस्था लावली. घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला.मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले. घृष्णेश्वराचे गेलेले वैभव परतले. हे कोणी केले? कोण होते हे शिवभक्त? ते होते मालोजी भोसले.



वेरुळचे भोसले: वेरुळ गावचे पाटील मालोजी भोसले हे थोर शिवभक्त होते. विठुजी त्यांचा धाकटा भाऊ. वेरूळच्या बाबाजी भोसले यांची ही मुले. वेरूळ गावची पाटील की बाबाजी भोसल्यांकडे होती.

मालोजी व विठोजी मोठे कर्तबगार होते, तसेच ते शूर होते. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते. तो काळ फार धामधुमीचा होता. निजामशाही वर उत्तरेच्या मोगल बादशहाने स्वारी केली होती. त्यावेळी दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होती. तेथे मलिकअंबर नावाचा त्याचा वजीर होता. त्याने दौलताबाद जवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली. त्याने निजामशहा जवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली. निजामशहाने मालोजीरावांना पुणे व सुपे परगण्यांची जहागिरी दिली.

भोसले यांच्या घरी वैभव आले. उमाबाई ही मालोजीरावांची पत्नी. ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती. या उभयतांना दोन मुलगे होते. एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी. शहाजी पाच वर्षाचा असताना मालोजीराव इंदापूरच्या लढाईत मारले गेले. विठोजींनी आपल्या पुतण्याचा आणि जहागिरीचा सांभाळ केला. पुढे त्यांनी शहाजीसाठी लखुजी जाधव यांच्या मुलीला मागणी घातली. जाधवाची लेक जिजाई मोठी सुलक्षणी होती. जिजाईसाठी विठोजींनी घातलेली मागणी लखुजींनी स्वीकारली.
शहाजीराजे आणि जिजाई यांचा विवाह मोठ्या थाटात पार पडला. जिजाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली.

शहाजीराजे: निजामशहाने मालोजीरावांचे जहागिरी शहाजीराजांना दिली. शहाजीराजे पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता. उत्तरेच्या मोगल बादशहाने निजामशाही जिंकायचा बेत केला. विजापुरचा आदिलशहाही त्याला मिळाला. तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले. दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. पण पुढे निजामशाहीत अंदाधुंदी निर्माण झाली. तिला कंटाळून शहाजीराजांनी निजामशाही सोडली. ते विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले. आदिलशहाने त्यांना ''सरलष्कर" हा किताब दिला. पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या. मलिक अंबर मृत्यू पावला. निजामशाही खिळखिळी झाली होती. अशात मोगल बादशहा शहाजहान याने निजामशाही वर स्वारी केली. तेव्हा आदिलशाही सोडून शहाजीराजे निजामशाहीत परतले.
                         शहाजीराजे भोसले

✍️ संकलन : सुमित रवि सरवदे

Comments

Popular posts from this blog

१०. शायिस्तेखानाची फजिती

शायिस्तेखानाजी स्वारी: विजापूरच्या आदिलशाहाने जंगजंग पछाडले. पण शिवरायांपुढे त्याचे काही चालले नाही. त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला. शेवटी आदिलशाहा नरम झाला. त्याने शिवरायांशी तह केला आणि स्वतंत्र राज्य मान्य केले. यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली. मग शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले. मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धुळधाण उडाली होती. त्या वेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाह होता. त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या. त्यामुळे बादशहा चिडला. त्याने आपुला मामा शायिस्तेखान याला शिवरायांवर पाठवले. तो पुण्यावर चालून आला. त्याच्याकडे पाऊण लाख सैन्य होते. शेकडो हत्ती,उंट आणि तोफा होत्या. शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत घेत शायिस्तेखान आला. त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. तो पुढे पुढेच येत होता. आणि एकदा मात्र डोंगराच्या खिंडित मराठ्यांनी त्याला गाठले. मराठे अतिशय चपळ, भीमथडी तट्टावर बसणारे ! चटणी-भाकर खावी, अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगरदऱ्यांतून धावपळ करावी, यांत मराठे फार पटाईत. मराठयांच्या गनिमी काव्यामुळे शायिस्तेख...

६. स्वराज्याचे तोरण बांधले

रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. पण केवढे अवघड कार्य होते ते ! दिल्लीचा मोगल बादशहा, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज, आणि जंजिऱ्याचा सिद्धी अशा चार सत्ता त्या वेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या. या सत्तांचा दरारा मोठा होता. त्यांच्याविरुद्ध ब्र काढायची कुणाची हिंमत नव्हती. अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता. कुठे शत्रूच्या फौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्यांचे अल्प बळ ! शिवरायांचा निश्चय अढळ होता. त्यातूनच बळ निर्माण झाले. तोरणगड : शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागिरी होती. जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते. किल्ल्यांशिवाय कसले आहे स्वराज्य. ज्याचे किल्ले त्याचे राज्य ! किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार. तेव्हा एखादा भक्कम केला लवकर हस्तगत केला पाहिजे, असे शिवरायांनी मनाशी ठरवले.  तोरणा किल्ला शिवरायांचा डोळ्यापुढ...