शिवाजी महाराजांपुर्वी महाराष्ट्रात चक्रधर,नामदेव,ज्ञानेश्वर,एकनाथ यासारखे अनेक थोर संत होऊन गेले. त्यांनी लोकांना दया, परोपकर, त्याग, सेवा, समता, बंधुभाव. इत्यादी गुणांची शिकवण दिली. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही सगळे सारखे;अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनांत निर्माण केली.
शेतकरी जमिनीची मशागत करतो आणि ती नांगरून पेरणीसाठी तयार करतो तसेच साधूसंतांचे कार्य आहे. त्यांच्या कार्याची आपण प्रथम ओळख करून घेऊ.
संत नामदेव :- संत नामदेव शिंपी समाजातील होते. ते विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तने केली व जनतेत जाग्रती निर्माण केली. संत ज्ञानेश्वरांबरोबर ते महाराष्ट्रभर ठिकठिकाणी फिरले. लोकांना त्यांनी गाढ भक्तीची शिकवण दिली. धर्मरक्षणाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनांत निर्माण केला. ज्ञानेश्वरानंतर नामदेव भारतभर फिरले.पंजाबात गेले.तेथिल लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला. हिंदी भाषेत पदे लिहीली. त्यांची काही पदे आजही शीख धर्मग्रंथात पहावयास सापडतात. महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरांतून मोठया भक्तीभावाने गायले जातात.
संत ज्ञानेश्वर : संत ज्ञानेश्वर नामदेवांपेक्षा पाच वर्षांनी लहान होते. ते आपेगाव चे राहणारे. सन १२७५ मध्ये त्यांचा जन्म झाला. निवृत्तीनाथ व सोपान देव हे त्यांचे बंधू. मुक्ताबाई ही त्यांची बहीण. त्या वेळचे कर्मठ लोक या मुलांना संन्याशाची मुले म्हणून नावे ठेवत, त्याचे कारण असे- त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता. घर सोडले होते. पण पुढे गुरूच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले. पुढे त्यांना ही चार मुले झाली. हे त्या वेळच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हते. लोकांनी त्यांना वाळीत टाकले होते. त्यांच्या मुलांचा लोक छळ करत होते.
ज्ञानदेव एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले; पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले. त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले. ते आपल्या झोपडीत आले. झोपडीचे दार बंद करून आत दुःख करत बसले. इतक्यात तेथे मुक्ता आली. गवताच्या पातीवर इतक्या मारत ज्ञानदेवांना म्हणाली, "ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अहो, आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल? जगाचे कल्याण कोण करील?" बहिणीच्या उद्देशाने ज्ञानदेवांना रूपाला दुःख विसरून ते कामाला लागले. ठीकठिकाणी गोरगरिबांचा,मागासलेल्या लोकांचा, धर्माच्या नावाखाली छळ होत होता. तेव्हा ज्ञानदेवांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला,"ईश्वरावर श्रद्धा ठेवा. सगळ्यांशी समतेने वागा. दु:खी माणसांना मदत करा, त्यांचे दुःख नाहीसे करा." त्यांचा उपदेश गेली सातशे वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकसारखा घुमत आहे.
त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथांमध्ये बंद झाले होते. संस्कृत भाषा सर्वसामान्य लोकांना समजत नव्हती. त्यांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मराठी ही होती. ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून "ज्ञानेश्वरी" हा फार मोठा ग्रंथ लिहिला. धर्माच्या ज्ञानाचे भांडार त्यांनी लोकांना खुले करून दिले. लोकांना बंधुभावाची शिकवण दिली. ज्ञानदेवांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दरसाल आषाढी-कार्तिकीला आळंदी पंढरीला जातात.
संत एकनाथ: संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा एकनाथांनी पुढे चालवली. संत एकनाथ पैठण चे राहणारे. त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला.त्यांनी अनेक अभंग,ओव्या व भारुडे लिहीली. कोणताही उच्चनीच भेदभाव मानू नका, असा त्यांनी लोकांना उपदेश केला. भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला. गोरगरिबांना, मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले. इतकेच नाही तर मुक्या प्राण्यावर देखील त्यांनी दया केली. प्राणीमात्रावर दया करा, असा लोकांनाही उपदेश केला. संत एकनाथ जसे बोलत तसे वागत.
एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नानाला निघाले होते. दुपारची वेळ होती. ऊन रखरखत होते. वाळवंट तापले होते. त्या तापलेल्या वाळवंटावर एक महाराचे पोर रडत बसले होते. त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला. त्यांनी इकडेतिकडे पाहिले. धावत त्या मुलाजवळ गेले. त्यांनी ते पोर उचलून कडेवर घेतले. त्याचे डोळे पुसले. त्याला त्याच्या घरी पोहोचते केले.
अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली.
संत तुकाराम : शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे. त्यांच्या घरी शेतीभाती होती. किराणा मालाचे दुकान होते, परंतु तुकाराम संसारात रमले नाहीत.जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत. आषाढी कार्तिकीला पंढरीला किर्तन करत, अभंग रचत, ते लोकांना म्हणून दाखवत. हजारो लोक त्यांच्या किर्तनाला येत. तुकाराम त्यांना दया-क्षमा-शांती यांची शिकवण देत. समतेचा उपदेश करत -
" जे का रंजले गांजले | त्यांसी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा | देव तेथेची जाणावा"
हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला. लोकांच्या मनात विचार जागे केले. लोक संत तुकारामांचा जयजयकार करू लागले. आजही महाराष्ट्रभर आपल्याला "ग्यानबा- तुकाराम'' हा जयघोष ऐकू येतो.
रामदास स्वामी : त्याच काळात महाराष्ट्राच्या कडेकपाऱ्यात "जय जय रघुवीर समर्थ" अशी रामदासांची गर्जना घुमत होती. त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जांब या गावी रामनवमीच्या दिवशी झाला. रामदास यांचे मूळ नाव नारायण, पण ते स्वतःला "रामाचा दास" म्हणू लागले. "दासबोध" या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला. तसेच त्यांच्या मनाच्या श्लोकांतून त्यांनी लोकांना सद्विचार व सद्वर्तन यांची शिकवण दिली. बलोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली. लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले.
" सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे "
हा संदेश त्यांनी लोकांना दिला. रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली. त्यामुळे त्या काळच्या लोकांना धीर आला. साधु संतांच्या कार्यामुळे लोक जागृती झाली. धर्माबद्दल आदर वाढला. लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला.
✍️संकलन : सुमित रवि सरवदे
Comments
Post a Comment