शिवजन्म : ते दिवस फार धामधुमीचे होते. उत्तरेकडून मुगल बादशहा शहाजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे. विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराख करून टाकले होते. शहाजीराजे अडचणीत सापडले होते. इकडे आड तिकडे विहीर ! शहाजीराजांच्या नशिबी धावपळीचे आयुष्य आले.
अशात जिजाबाई गरोदर होत्या. तेंव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे ? हा प्रश्न उभा राहिला .शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील किल्ला. त्याच्या चारी बाजूंना उंच कडे, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते. किल्ला मोठा मजबूत होता. विजयराज हे त्याचे किल्लेदार होते. ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते. जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुलावर चालून गेले.
आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. वैशाख शुद्ध द्वितिया शके १५४९ (सन १६२७) शिवनेरीच्या नगारखान्यात सनई, चौघडा वाजत होता. अशा मंगल मुहूर्तावर जिजाबाई च्या पोटी पुत्र जन्मला. किल्ल्यावर आनंदी आनंद झाला. बाळाचे बारसे झाले. शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीच्या नावावरून त्याचे नाव "शिवाजी" ठेवले.
शिवरायांचे बालपण : शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्ष फारच धावपळीत गेली. पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या सांजवात लावत. शिवबाला जवळ घेत, मायने त्याला कुरवाळत, त्याला रामाच्या कृष्णाच्या, भिमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. तसेच कधी ज्ञानोबांचे, कधी नामदेवांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूर महापुरुषांच्या गोष्टी आवडत. साधुसंतांची चरित्रे ही त्यांना आवडत.
गरीब मावळ्याची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधीकधी शिवबा ही त्यांच्या झोपडीत जात. त्यांची कांदाभाकर आवडीने खात. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत. मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातली पाखरे ! ती पोपट,कोकिळा,वाघ यांचे हुबेहुब आवाज काढत. मातीचे हत्ती, घोडे बनवणे ; मातीचे किल्ले रचणे हेच त्यांचे छंद ! लपंडाव, चेंडू ,भवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. शिवरायही त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार आवडायचे.
शहाजीराजांच्या जीवनातील ही सहा वर्षे अतिशय धावपळीत गेली. या काळात काही दिवस ते मोगलांच्या बाजूने लढले, मग पुढे मुघलांच्या विरुद्ध उभे ठाकले. तीन-चार वर्षे मुघलांशी त्यांनी झुंज दिली, पण त्यात त्यांना यश आले नाही. निजामशाही मोडली तेव्हा विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी त्यांनी सरदारकी पत्करली. जिजाबाई व बालशिवराय यांना घेऊन ते बंगळुरास गेले. तिथे त्यांना थोडा स्वस्थपणा मिळाला. त्यांनी शिवरायांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. शिवराय महाभारत, भागवत, रामायण यातील गोष्टी वाचू लागले. घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरविणे, तलवार चालवणे यात तरबेज होऊ लागले. पुढे आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकात मोहिमेवर जाण्यास सांगितले. कर्नाटकातील मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराज्यांनी जिजाबाई आणि शिवराय यांची पुण्याला रवानगी केली.
पुणे पालटले : शिवराय पुण्याला आले. त्यांना बालपणीचे दिवस आठवले. बालपणी शिवनेरीच्या मातीत ते खेळले होते. ती माती त्यांच्या पायाला लागली होती. सह्याद्रीची उंच उंच शिखरे त्यांना पुन्हा दिसली. त्यांना खूप खूप आनंद झाला. त्या वेळचे पुणे आजच्या इतके मोठे नव्हते. मुठा नदीच्या काठावरील ते एक गाव होते. लोक त्याला पुनवडी म्हणत. शहाजीराजांच्या शत्रूंनी हे टुमदार गाव उद्ध्वस्त करून टाकले होते. गावातील मालमत्तेची नासधूस झाली होती. घरे मोडली होती, देवळे पडली होती. शत्रूच्या भीतीने लोक गाव सोडून पळून गेले होते. शेते ओसाड झाली होती. जंगले वाढली होती. रानात लांडगे माजले होते.अशी पुण्याची दैनावस्था झाली होती.
जिजाबाई शिवरायांनासह पुण्यात राहू लागल्या. हे आसपासच्या गावातील लोकांना समजले, तेव्हा लोकांना मोठा धीर आला. लोक पुण्याला येऊन राहू लागले. शेतावर जाऊ लागले. जिजाबाईंनी फडकी देवळे दुरुस्त करून घेतली. देवळात सकाळ-संध्याकाळ देवपूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले. त्यामुळे पुण्याचे रूप पालटले.
दादाजी कोंडदेव : शहाजीराजांनी जिजाबाई आणि शिवराय यांच्याबरोबर दादाजी कोंडदेव यांना पाठवले होते. जिजाबाई व शिवराय यांची काळजी घ्यायची व जहागिरीचा कारभार पाहायचा हे कामे त्यांच्याकडे सोपवली होती. दादाजी मोठे इमानी होते. कारभारात चोख होते. तसेच ते न्यायी होते. त्यांची शिस्त कडक होती. शहाजीराजे आणि जिजाबाई यांच्यावर त्यांची निष्ठा होती. शिवरायांवर त्यांचे फार प्रेम होते.
दादोजी कोंडदेव
दादाजींची कामगिरी : जिजाबाई आणि शिवराय यांना राहण्यासाठी त्यांनी पुण्यात मोठा वाडा बांधला. त्याचे नाव लाल महाल. शेतकऱ्यांनी शेतीची लागवड करावी म्हणून दादाजींनी त्यांना काही वर्ष साऱ्याची सूट दिली. त्यामुळे शेते लागवडीस आली. माजलेले लांडगे शेतकऱ्यांना त्रास देत म्हणून लांडगे मारण्यासाठी त्यांनी बक्षिसे लावली. त्यामुळे बरेच लांडगे मारले गेले. चोरांचा सुळसुळाट झाला होता. दादाजींनी शेतकऱ्यांची पथके उभारली व त्यांचा पहारा बसवला. त्यामुळे चोरांचा बंदोबस्त झाला. शेत जमिनीची प्रतवारी ठरवून तिच्यावर त्यांनी सारा आकारला. लोकांना आनंद झाला.
दादाजींचा देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण पुढे चालु झाले. घोडा भरधाव फेकणे, तलवार चालवणे, भाला फेकणे, तिरंदाजी करणे, पट्टा फिरविणे, कुस्ती खेळणे यात शिवराय तरबेज झाले. जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी दादाजींबरोबर शिवराय स्वतः जात. शिवरायांच्या समक्ष दादाजी लोकांचे तंटे तोडत, न्यायनिवाडा करत. त्यामुळे लोकांना आपलेसे कसे करावे, न्याय कसा द्यावा या गोष्टी शिवरायांना कळू लागल्या.
आईचा उपदेश : दादाजींबरोबर शिवराय मावळात फिरत असत. मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत. मावळे इमानी,कष्टाळू व चपळ होते. सुलतानी त्रासाने ते गांजले होते. त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावे असे शिवरायांना वाटू लागले. घरी आल्यावर शिवराय जिजाईपाशी हितगुज करत. जिजाबाई म्हणत, "शिवबा, भोसल्यांचा पूर्वज श्रीरामचंद्र. श्रीरामचंद्राने दृष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले. जाधवांचा पूर्वज श्रीकृष्ण, त्याने दुष्ट कंसाचा ठार केले आणि प्रजेला सुखी केले. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे. अरे, तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील. तु सुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील." आईच्या उपदेशाने शिवरायांना हुरुप येई. राम,कृष्ण, भीम,अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवत. हे वीरपुरुष शिवरायांच्या सतत ध्यानी, मनी, स्वप्नी दिसत. हे वीर अन्यायाविरुद्ध जसे लढले, तसे आपण लढावे. त्यांनी दुष्टांचा नाश केला, तसा आपण करावा. त्यांनी प्रजेला सुखी केले, तसे आपण करावे. आपण न्यायी व्हावे, धाडसी व्हावे, पराक्रमी व्हावे, असे शिवरायांना सतत वाटू लागले.
दादाजी आणि जिजाबाई यांच्या प्रेमळ देखरेखीखाली शिवराय मोठे होत होते. शहाजीराजांच्या जहागिरीचा कायापालट होत होता. पुढे होऊ घातलेल्या स्वराज्याचा नमुना मावळ्यांना येथे पाहायला मिळत होता. जणू तो स्वराज्याचा अरुणोदय होता!
पुणे जहागिरीत आता शिवरायांचा नवा अंमल सुरू झाला. या कामासाठी शहाजीराजांनी पूर्वतयारी करून घेतली होती. त्यांनी शिवरायांना बंगलोरहून पुण्याला पाठवताना शामराव निळकंठ पेशवे, बाळकृष्ण हनुमंते मुजुमदार, सोनोपंत डबीर, अत्रे सबनीस अशी मातब्बर मंडळी त्यांच्याबरोबर दिली होती. जणू हे सर्व स्वतंत्र राजाचे अधिकारीच. शिवरायांनी आपल्या जहागिरीचा कारभार उत्तम रीतीने पाहावा म्हणून शहाजीराजांनी हे अधिकारी पुण्यास पाठवले होते.
शिवरायांचा विवाह : शिवराय चौदा वर्षांचे झाले तेव्हा जिजाबाईंनी त्यांच्या लग्नाची बोलणी सुरु केली. या काळात अगदी लहानपणीच लग्न करण्याची पद्धत होती, तेव्हा जिजामाता म्हणाल्या, "आता आमचा शोभा चौदा वर्षांचा झाला, तेव्हा त्याचे दोहोंचे चार हात करायला पाहिजेत." शिवबाकरीता त्या मुली पाहू लागल्या. एक मुलगी त्यांना पसंत पडली. तिचे नाव सईबाई. फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील ती मुलगी. पुण्याच्या लाल महालात हा विवाह मोठ्या थाटामाटात साजरा झाला. पण लग्नात एक रुखरुख मात्र राहिली. शहाजीराजे काही शिवबाच्या लग्नाला हजर राहू शकले नाहीत. ते एका लढाईत गुंतले होते.
✍️संकलन : सुमित रवि सरवदे
Comments
Post a Comment