जरब बसवली : शिवरायांच्या अवतीभोवती बारा मावळांतील मावळे गोळा झाले. शिवराय सांगतील ती कामगिरी बजावत होते. स्वराज्यासाठी जगायचे आणि स्वराज्यासाठी मरायचे, असे ते मानत होते. साधीभोळी मराठमोळी माणसे ती ! त्यांना शिवराय म्हणजे जीव की प्राण वाटत. पण शिवरायांच्या कार्याबद्दल मनातल्या मनात जळणारी, पिढ्यानपिढ्या आदिलशाहीची चाकरी करण्यात धन्यता मानणारी अशी काही मंडळी होती. त्यांना शिवरायांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटे. निंबाळकर, घोरपडे, मोरे इत्यादी मराठे सरदार शिवरायांच्या स्वराज्याला विरोध करत. अशांचा बंदोबस्त करणे शिवरायांना भाग पडले.
खंडोजी आणि बाजी घोरपडे हे मराठे सरदार आदिलशहाच्या चाकरीत होते. आदिलशहाने त्यांना शिवरायांच्या विरुद्ध चिथावले. कोंढाणे भागात त्यांनी धुमाकूळ माजवला. परंतु शिवरायांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. शिवरायांनी त्यांना पिटाळून लावले.
तसेच फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर, हे तर शिवरायांचे मेहुणे. त्यांनीही आदिलशाहीशी संगनमत केले. शिवरायांविरुद्ध कारस्थाने सुरू केली. शिवरायांनी फलटण वर हल्ला करून निंबाळकरास कैद केले.
शिवरायांचा जवळचा नातलग संभाजी मोहिते हा शिवरायांच्या सुपे परगण्यांत होता. त्यानेही शिवरायांविरुद्ध कारवाया सुरू केल्या. शिवरायांनी सुप्याला जाऊन त्याला पकडले. आणि त्याची रवानगी कर्नाटक प्रांतात केली. कर्तव्यापुढे शिवराय नातेगोते मानत नसत.
जावळीचे चंद्रराव मोरे : शिवरायांच्या कार्याची थोरवी साऱ्या मावळ्यांना कळली. शिवरायांचे नाव सर्वत्र दुमदुमले. शिवराय लोकांचे राजे झाले. पण ते काही लोकांच्या डोळ्यांत खुपले. जावळीचे मोरे असेच होते. मोरे हे जावळीचे जहागीरदार. त्यांची जहागीर रायगडापासून कोयना खोऱ्यापर्यंत होती. विजापूरचा आदिलशहाचे ते जहागीरदार होते. आदिलशहाने त्यांना 'चंद्रराव' हा किताब दिला होता. जावळीचे जंगल अत्यंत दाट होते. भर दिवसा सूर्यकिरणांना ही तेथे शिरकाव नव्हता. त्यात वाघ, लांडगे, अस्वले इत्यादी श्वापदे संचार करत. मोऱ्यांची जावळी म्हणजे वाघाची जाळी होती ! त्यामूळे मोर्यांच्या वाटेला कोणी जात नसे. पण ती हिंमत केली शूर शिवरायांनी.
त्याला कारण असे -- दौलतराव मोरे १६४५ साली मरण पावला. त्याच्या वारसांमध्ये तंटे सुरू झाले. शिवरायांनी यशवंतराव मोरे याला मदत केली. त्यांच्या मदतीनेच यशवंतराव जावळीच्या गादीवर बसला. त्या वेळी यशवंतरावाने शिवरायांना खंडणी देण्याचे कबूल केले. त्यांच्या कार्यात मदत करण्याचेही कबूल केले. पण गादीवर बसल्यावर मात्र तो सारे विसरला. कुठला शिवाजी आणि कुठला करार ! तो बेपर्वाईने वागू लागला. स्वराज्यातील मुलुखावर स्वाऱ्या कर, प्रजेला त्रास दे अशी यशवंतराव दांडगाई करू लागला. वेळीच त्याचा बंदोबस्त केला नाही तर हा स्वराज्याला धक्का पोहोचेल हे शिवरायांनी ओळखले.
'बंड केलिया मारले जाल' : प्रथम शिवरायांनी यशवंतराव मोरे यांना एक खरमरीत पत्र धाडले. "तुम्ही राजे म्हणविता. राजे आम्ही. आम्हास श्रीशंभू ने राज्य दिधले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे."
यशवंतराव मोरे याने उद्धटपणे उत्तर लिहिले, "तुम्ही काल राजे जाहला. तुम्हास राज्य कोणी दिधले? येता जावळी, जाता गोवळी.... आम्हास श्रींचे कृपेने आदिलशहाने राजे हा किताब, छत्रचामर, सिंहासन मेहरबान होऊन दिधले. येथे उपाय कराल तर अपाय होईल.
शिवरायांनी उलट टोला दिला, "जावळी खाली करून, राजे न म्हणोन, छत्रचामर दूर करून, हात रुमाले बांधून, भेटीस येऊन, हुजूराची चाकरी करणे इतकियावर बदफैली केलिया, मारले जाल."
जावळीभोवती घनदाट जंगल होते. रायरीचा किल्ला अजिंक्य होता. मोरे मंडळीही पुष्कळ होती. जावळी जिंकणे सोपे नव्हते. भरपूर तयारी करून शिवरायांनी जावळीवर स्वारी केली.
१५ जानेवारी१६५६ ला महाराजांनी जावळीवर हल्ला केला. १५ जानेवारी १६५६ ते ६ एप्रिल १६५६ पर्यंत हि मोहिम रायरी जिंकेपर्यंत चालली. म्हणजे 15 जानेवारी ते 6 एप्रिल हया काळात महाराज जावळी परिसरातच होते.
सुमारे महिनाभर यशवंतरावांनी झुंज दिली पण त्याचे खुप सैन्य मारले गेले. अखेरीस आपल्या मुलांना घेऊन यशवंतराव रायरीवर पळाला. शिवरायांनी जावळी घेतली. नंतर शिवराय रायरीवर चालून गेले. त्यांनी रायरीच्या किल्ल्याला भक्कम वेढा दिला. यशवंतराव तीन महिने निकराने लढला. पण अखेरीस त्याला माघार घ्यावी लागली.
किल्ले रायगड : जावळीचा विजय फार महत्त्वाचा होता. त्या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले. रायरीचा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला. हा किल्ला बघून शिवरायांना धन्य वाटले. त्यांनी या किल्ल्याचे नाव 'रायगड' ठेवले. जवळच भोरप्या डोंगरावर शिवरायांनी एक नवीन किल्ला बांधला. त्याचे नाव ठेवले प्रतापगड.
✍️संकलन : सुमित रवि सरवदे.
👉 वाचा : शिवरायांनी जावळीच्या यशवंतराव मोरेला दंडित का केले.
http://srsumit.blogspot.com/2020/06/blog-post.html
Comments
Post a Comment