रायरेश्वराचे शिवालय : पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे शिवालयात मोठे रमणीय स्थान होते. तेथे १६४५ साली एक विलक्षण प्रसंग घडला. शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यांमधील काही मावळे मंडळी मसलतीसाठी तिथे जमली होती. त्या किर्र अरण्यात झाडाझुडपांत लपलेल्या रायरेश्वराच्या शिवालयात शिवरायांबरोबर कसले खलबत ते मावळे करत होते. श्रीशंकरापाशी कोणता वर मागत होते?
बालशिवबाजी तेजस्वी वाणी : शिवराय अजून वयानं कितीतरी लहान होते, पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती. त्यांनी एक मोठा घाट घातला होता. त्या शिवालयात जमलेल्या सवंगड्यांना ते कळकळीने म्हणाले, "गड्यांनो, मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? आमचे वडील शहाजीराजे विजापूर ते सरदार आहेत. त्यांनीच आम्हाला येथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे. दादाजीपंत या जहागिरीचा कारभार पहात आहेत. गांवकऱ्यांमधील सर्व कटकटी मिटवत आहेत. कोंढाण्याचे सुभेदार म्हणून त्यांचा सर्वत्र वचक आहे. सर्व कसे छान चालले आहे. पण गड्यांनो, मला यात मुळीच आनंद वाटत नाही. सुलतानांच्या वतनदारी वर आपण संतुष्ट रहावे का? दुसर्याच्या ओंजळीनेच आपण पाणी प्यावे का? आपल्या चारी बाजूंना अनेक परकीय राजवती आहेत. त्यांच्यामध्ये सारखी युद्धे चालू असतात. आपली माणसे या युद्धात नाहक मरतात. कुटुंबेच्याकुटुंबे देशोधडीला लागतात. आपल्या मुलखाची धूळधाण होते. आणि इतके सोसूनही आपल्या पदरी काय? तर गुलामगिरी ! आपण हे किती दिवस सहन करायचे? दुसऱ्यासाठी आपण किती काळ खपायचे? सांगा, तुम्हीच सांगा ! देशमुखी वतनाच्या लोभाने आपण हे असेच चालू द्यायचे का?"
शिवराय आवेशाने बोलत होते. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. बोलता बोलता ते थांबले. त्या तरुण सवंगड्याकडे पाहू लागले. रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांचे बोलल्याने थरारून गेले. नवी दृष्टी त्यांना मिळाली. त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, "बोला, बालराजे, बोला. आपला मनोदय सांगा आम्हाला. तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत." "हो राजे, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू! आमचे प्राणही देऊ," ते सारे तेजस्वी तरुण वीर एका आवाजात बोलले.
स्वराज्याची शपथ : मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले. एकेकाकडे पाहत ते आनंदाने म्हणाले, "गड्यांनो ! आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे, सर्वांनी खपायचे, सर्वांनी प्राणही अर्पण करायचे. ते आपले ध्येय म्हणजे 'हिंदवी स्वराज्य' ! तुमचे, माझे, साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. परकीयांची गुलामी आता नको. उठा, या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू. स्वराज्यस्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार."
सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले. "हिंदवी स्वराज्याच्या रूपानं हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करू या." शिवराय शेवटी निश्चयाने बोलले.
रायरेश्वराच्या शिवालयातून सारे मावळे बाहेर पडले ते स्वराज्याच्या आणाभाका घेऊनच. शिवरायांचे मन उचंबळून आले. ते पुण्यास येताच तडक लाल महालात मातोश्रीकडे गेले. घडलेला प्रसंग त्यांनी जिजाबाईंना सांगितला. त्या माऊलीला धन्य धन्य वाटले. आपण मनी जे धरले ते बालराजे पूर्ण करणार अशी आशा, असा विश्वास त्यांना वाटू लागला.
मावळ खोऱ्यातील जमवाजमव : शिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागले. मावळ्यांना घेऊन हे तलवारीचे हात करू लागले. घोडदौड करावी, डोंगरांतील आडमार्ग शोधावेत, खिंडी, घाट, चोरवाटा निरखाव्यात असा त्यांचा नित्यक्रम सुरू झाला. शिवरायांनी मावळ्यांची अंतःकरणे जिंकून घेतली. तरुण मावळे शिवरायांसाठी वेडे झाले. शिवरायासाठी जगायचे, शिवरायांसाठी मरायचे असे ते मानू लागले. शिवरायांचे हे उद्योग बघून दादाजी कोंडदेवांचे मन उचंबळून यायचे. पण एखादे वेळी त्यांना भीतीही वाटायची. त्यांना वाटायचे, "शिवरायांच्या या हालचालींमुळे विजापूरचा आदिलशहा जागा होईल. मग त्याच्या फौजेपुढे शिवरायांचा निभाव कसा लागेल?' दादाजी बेचैन होत. पण शिवरायांनी त्यांना निश्चयाने सांगितले, "हे राज्य व्हावे ही श्रींची ईच्छा आहे.'' दादाजी म्हणाले, "राजे, शहाजीराजांचा इमानी नोकर. आपल्या कल्याणावरच माझे चित्त ! सुलतानांचे बळ प्रचंड त्यांच्याविरुद्ध तुम्ही उठाव करणार? तुम्ही लहान. तुमची शक्ती लहान, म्हणून भीती वाटते इतकेच ! एरवी तुम्ही हाती घेतलेले कार्य थोर आहे. कुणीतरी हे कार्य हाती घ्यायलाच हवे. तुम्ही पुढे व्हा ! देवाचे आशीर्वाद तुमच्या पुण्य कार्याला आहेत. साधू-संतांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. जिजाई मातोश्रींचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही यशस्वी व्हाल." जिजामाता आणि दादाजी कोंडदेव यांचे आशीर्वाद मिळाल्यावर मग काय? शिवरायांच्या हालचालींना उधाण आले. समुद्राला भरती यावी तसे. शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व कोट, किल्ले आपल्या सवंगड्यांसह बारीक नजरेने न्याहाळले. चोरवाटा, भुयारे, तळघरे, दारुगोळा, हत्यारे आणि शत्रूंच्या फौजांची ठाणी यांची खडानखडा माहिती मिळवली.
मावळातील सोबती : मावळांत ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती. त्यांना आपल्या वतनाचा विलक्षण लोभ होता. वतनासाठी ते आपापसांत भांडत. या भांडणात मराठ्यांची शक्ती उगाच वाया जात असे, हे शिवरायांनी ओळखले. त्याला आळा घालायचे त्यांनी ठरवले. दादाजी कोंडदेवांबरोबर शिवराय देशमुखांच्या गावांना भेटी देत. त्यांची समजूत घालत. स्वराज्याच्या ध्येयाने त्यांना भारून टाकत. शिवरायांनी त्यांना गोड शब्दांनी आपलेसे केले. पण काहींनी दांडगाई केली. त्यांनाही शिवरायांनी वठणीवर आणले. मराठ्यांचे आपापसातील जीव घेऊ झगडे त्यांनी थांबवले. जो तो त्यांना धन्यवाद देऊ लागला. मावळ खोऱ्यातील झुंजारराव मरळ, हैबतराव शिळमकर, बाजी पासलकर, पायगुडे, विठोजी शितोळे, जेधे,बांदल इत्यादी देशमुख मंडळी शिवरायांचा शब्द मानू लागली. मावळात स्वराज्याची घोडदौड सुरू झाली.
शिवरायांची राजमुद्रा : शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरू झाला होता. शहाजीराजे ही अधूनमधून दादाजींना सावधगिरीचा इशारा देत होते. शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती. ती मुद्रा अशी --
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ||
शाहसूनों: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ||
प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे हळूहळू वाढणारी ही राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे. साऱ्या विश्वाला वंद्य होणारी आहे. असे बोलणारी ती राजमुद्रा म्हणजे स्वराज्याचा शुभशकुनच होता.
त्या काळात राजमुद्रा बहुदा फार्सी भाषेत कोरलेला असत. पण शिवरायांची मुद्रा संस्कृत भाषेत होती. स्वराज्य हवे तशी स्वभाषा हवी, स्वधर्म हवा. शिवरायांनी आपला कारभार लोक कल्याणासाठीच सुरू केला आहे, हे साऱ्या मावळ्यांच्या चटकन लक्षात आले.
✍️संकलन : सुमित रवि सरवदे
Comments
Post a Comment